PayPal

Saturday, November 30, 2013

इच्छा!

फक्त इतकीच इच्छा, हा प्रवास संपावा.
दुःखांशी माझा, सहवास संपावा.

मृत्यू येऊन भेटावी, प्रत्यक्ष मला.
खोटेच जगण्याचा, भास संपावा.

कुठे शब्दांनी माझ्या, मिळवले तुला?
त्यांचा हा निकामी, प्रयास संपावा.

झेंडूची फुले चढावीत, तिरडीवर माझ्या.
गुलाबांचा आता, सुवास संपावा.

ऐकून तुझ्या ओठी, गीत कोणतेही माझे,
देहावरी श्वासांचा...मिजास संपावा!!!

Wednesday, November 27, 2013

मागणे!

मी अजूनही तुझ्याकडे, आणखी काहीच मागत नाही.
अश्रू दे अजून थोडे, एवढ्याने भागत नाही.

चुम्बले मी ओठ तुझे, ते त्या मिठीचे पाप होते.
विश्वास ठेव थोडा, मी खोटं सांगत नाही.

नशेत तुझ्या मी, थोडा अडखळलो होतो.
पिल्यावर सहसा मी, असा वागत नाही.

देवानी तरी झोळीत माझ्या, का टाकावे तुला?
त्याच्यासमोर दिवा, मी लावत नाही.

लिहायसाठी मला आता, मन दे तुझे जरा.
कागदांवर प्रेम माझे, आता मावत नाही!

Friday, November 22, 2013

डाव!

बऱ्याचदा बरेच त्यांनी, डाव शिजवले होते.
सूर्याला का कधी,कोणी विझवले होते?

आत्ता मला कळाले, का जळाली त्यांची.
आगीत मी शब्दांना, थोडे भिजवले होते.

जेव्हा कधी त्यांनी, मला दाबले जरासे,
मी ताठ राहून उभा, त्यांना खिजवले होते.

सोडून चाललो होतो, ही दुनिया मतलबी मी.
गझलांनी माझ्या मला, तेव्हा रिझवले होते.

शब्दांची माझ्या, कोणी काय लावणार बोली?
माझ्या गझलांनी भल्या-भल्यांना...खाली निजवले होते!

Wednesday, November 13, 2013

फरार!

दाटला पुन्हा, अंधार आता.
दाटून येई गळा, यार आता.

कष्टाळू आयुष्याने, मेहनतीने रडवले मला.
वाढणार म्हणे त्याचा, पगार आता.

मला हसवण्याची, वेळ संपली तुझी.
प्रेमा रे हो तू, पसार आता.

केव्हापासून काळोखात, लुप्त व्हायचे होते.
कृतीत आणावा म्हणतो, विचार आता.

वाट पाहून तुझी, सरणावर झोपलो मी.
का थाटतेस आपला, संसार आता?

आसवांचे तेल ओतून, गझलांनी पेटवली चिता मी.
बघतो होतेच कशी मृत्यू...फरार आता!!!

Sunday, November 10, 2013

दीडशहाणी!

कुठून शब्द शोधू, गाऊ कशी मी गाणी?
आजन्म चालली गझल, काट्यांवरी अनवाणी.

फुटला कंठ मला, गळा तेव्हा दाटून आला.
ऐकवलीच कुठे तुला, मी माझी कहाणी.

जाणे कुठे अडला, तो यमाचा रेडा.
का नुसतीच करून गेला, माझ्या दुःखांची पहाणी?

पोचवणारे खांदे, वळले चारही दिशांना.
इथेही चाले, त्यांचीच मनमानी.

कफनाचे माझ्या, खिसे चपापले त्यांनी.
मिळाल्या काही फाटक्या नोटा...काही खोटी नाणी.

केव्हाचा सरणावर, मी आडवा पडून आहे.
मृत्यूही माझी साला...दीडशहाणी!

Friday, November 8, 2013

दहाड!

लहरी मी फार आहे, भलताच उनाड आहे.
मी झोंबणारी मिरची, कुठे मी ग्वाड आहे!

हृदय छेदणारा, कातील कवी मी.
गझल नुसती न शब्दरचना, जालीम चिरफाड आहे!

वळली की पाठ माझी, का येई चेव तुम्हाला?
छातीवर वर वार करा ती,खुली सताड आहे!

घालून पालथे या, बंडखोर गाव सारे.
नसेन मी ज्या गावी, ते ओसाड आहे!

जगावरी ह्या, खुले-आम चढवतो हल्ला.
जंगलात कोल्ह्यांच्या ह्या, गझल माझी दहाड आहे!!!

Thursday, November 7, 2013

श्वास!

कित्ती उगाच झाला, केवढा हा त्रास झाला!
तुझ्यविना जीव माझा, मलाच बास साला!

शब्द दिले तुला पण, कागद कोराच माझा.
माझ्या कवितांचा, पांगळाच प्रवास साला!

नकार ना तुझा अन् होकारही तुझा ना,
उत्तर म्हणुनी प्रश्न मिळे, माझ्या प्रश्नास साला!

एक एक दिवस जातो,छळूनी मला अन्
सांज खिन्न माझी, रात्र उदास साला!

जाळतो मला, पितो जो घोट मी तो
खातो जो घास जो तो, बोचतो घशास साला!

सर्वस्व दिले तुला मी, उरले ना काही आता.
घेऊन जा, नको हे...उरले-सुरले श्वास साला!

Sunday, November 3, 2013

किती!




आता सांगू मी तरी, कुणास किती.
आहेत तरी लोक माझ्या, आस-पास किती?

माझ्याच झाडाने, पळविली सावली माझी.
दोष मी तरी देऊ, उन्हास किती.

वेदना सुसह्य झाल्या, जगणे असह्य झाले.
खोटाच ताव मारू, मिशास किती.

मृत्युनेही तेव्हा, आमंत्रण नाकारले माझे.
उसने उगाच घेऊ, श्वास किती.

चीतेभोवती माझ्या, उदबत्त्या पेटल्या जरी,
अजूनही तुझा इथे, सुवास किती.

चोरून आग माझीच, पेटली चिता जरी ही,
बघ त्या काळ्या धुराची...मिजास किती!

Sunday, October 13, 2013

मजाल!

भरल्या बाजारपेठी,फिरती दलाल आता.
भडव्यांच्याच माथी,लागे गुलाल आता.

उघड्यावर मांडलेले, नागडे इमान त्यांचे.
पांघरती फाटलेली, अब्रूची शाल आता.

विकली माय मराठी,लाविली हाय बोली.
ती 'ठेवलेली' इंग्रजी, नांदते खुशाल आता.

पडली ओसाड कधीची, वेश्यांची वस्ती.
इमान 'झोपते' खाली, झाली कमाल आता.

भोगती बंडखोर सारे, काळ्या पाण्याची शिक्षा.
ते चोर पांढरपेशी, बांधती महाल आता.

शब्दांची फौज घेऊन, गझलेने चढवेन हल्ला.
पुढे उभे ठाकण्याची, कोणाची मजाल आता!


Thursday, October 10, 2013

माज!

मी ही पाहतो करून, आता माज जरा.
वाजवून पाहतो मी ही, बंडाचा साज जरा.

ऐकविले दुनियेने, ऐकून घेतले मी.
मी ही चढवेन म्हणतो, माझा आवाज जरा.

बेईमानी ह्या जगाशी, ईमानी वागणे झाले.
मी ही होतो आता, दगाबाज जरा.

झाला आता रिकामा, संयमाचा प्याला.
मस्तीची दारू थोडी, आता पाज जरा.

आणा जवळ तुमचा, माजोर्डा गाल आता.
माझ्याही तळहाताला...सुटली खाज जरा !

Wednesday, October 9, 2013

वहाण!

मी सैरभैर वारा, माझे ठिकाण नाही.
फक्त हृदयात राहतो मी, दुसरे कोणतेच स्थान नाही.

जंगलात शतपावली, करणारा सिंह मी.
लाळ घोटणारा, मी श्वान नाही.

असतील तुडुंब भरलेल्या, तुमच्या बाजारपेठा.
कधीच थाटिले मी, माझे दुकान नाही.

मी का भीख मागू? शब्दांचा बादशहा मी!
गझल माझी नाही बिकाऊ. मी ही गहाण नाही!

कशास जुमानू,  आज्ञा तुमची मी?
डोक्यावर ठेवितो मी...माझे वहाण नाही!

Saturday, October 5, 2013

ओठ मी तुझे ...



चौकटींतच होते, आयुष्य आखलेले.
बंदिस्त आयुष्य माझे, दु:खांनी माखलेले.

आसवे सदाच होती, अगदी चिकटून मला.
सुख सारे होते, दूर पांगलेले.

काय काय म्हणुनी तुला, आज सांगू मी?
कोण-कोण कसे-कसे, तेव्हा वागलेले.

स्मशानी देह फक्त, जायचे राहिले होते.
मन केव्हाच माझे, होते राख-लेले.

तू आलीस आणि, मन माझे मोहरून गेले.
आयुष्य माझे, तुझ्यामुळेच बहरलेले.

तू विचारलीस मला, हा गोडवा कुठून आला.
ओठ मी तुझे तेव्हा... होते चाखलेले!

नाव

का म्हणुनी आता, मी थांबावे?
का दूर तू असावीस, का दूर मी रहावे?

सोडूनी जाताना, सुटतो हा श्वास माझा.
किती वळून मी बघावे, अन् थांबून तू पहावे?

किती तोल जावा, माझ्या आसवांचा?
मनाने स्वतःला, किती सावरावे?

छळते रात्र मला ती, खिन्न तारकांची.
एकांत मी अजुनी, किती पांघरावे?

दे कौल तूच आता, ही आहे व्यथा तुझीही.
शब्दांनीही किती, मोकळेच परतावे?

नावापुढे तुझ्या तू, लाव नाव माझे.
बनाव ह्या जगाला, प्रेम आपुले कळावे!

Thursday, October 3, 2013

मंजूर...

मी नाही मनुष्य नाही,
मी एवढा क्रूर नाही!
 ही जात खाटीकांची मला मंजूर नाही!

      तुम्हीच रचा नवे हे,
      संगीत जगण्याचे,
     लागेल नाटकी जो,
     तो माझा सूर नाही!
       ही जात खाटीकांची मला मंजूर नाही!

            ही कसली आसवे तुमची?
             हे कसले सरण माझे?
           मी जाळले देह कधीचे,
          हा ताजा धूर नाही!
                 ही जात खाटीकांची मला मंजूर नाही ! 

शुद्ध काळा!

ह्या थोरल्या बांडगुळात, मी ही बाळ नाही.
सशत्र बंडखोर मी, मी मवाळ नाही!

हातावर लेखणीने माझ्या, मीच आखतो रेषा.
नशिबी गहाण ठेवले, मी माझे कपाळ नाही!

माझ्याच गीतांवर, वाजतात ढोल-ताशे.
मळलेल्या हातांतला, मी टाळ नाही!

येणाऱ्या पिढ्यांच्या, हृदयातले गीत मी.
विसरतील मला काय, मी भूतकाळ नाही!

ह्या पांढरपेशी भुरट्यांचे, मी कशास झिजवू उंबरे?
शब्द शुद्ध काळे माझे, मी ही गव्हाळ नाही!

Monday, September 30, 2013

गझलसम्राट श्री सुरेश भट यांच्या चरणी सादर अर्पन.



असतील कोटी अनंत, आम्ही देव मानत नाही.
एक फक्त 'भट' आमुचे, आम्ही बाकी जाणत नाही.

शिकलो जो भटांकडून, तो हाच झंझावात आमुचा.
गर्दीत चोरपावलांनी, आम्ही चालत नाही.

फाटक्या झोळीत आमुच्या, भटांनीच भरले तारे.
या भुरट्या जगाची, तेवढी दानत नाही!

हृदयात डरकाळ्या, भटांच्या जपतो आम्ही.
आम्ही लाळ घोटणारे, पाळीव पाळत नाही!

शब्दा-शब्दात वणवा, घेऊन फिरतो आम्ही.
मौसमी शेकोट्या, आम्ही जाळत नाही!

नशिबास मी कधीही… नाही विचारलेले!

आभाळ माझे, होते ढगाळलेले
आज आसमंत सारे, सुखांनी गंधाळलेले.

कुठे देहास माझ्या, उरल्या होत्या संवेदना?
आज तेच तुझ्या, स्पर्शाने शहारलेले!

ओठांना माझ्या, लाभले ओठ तुझे.
शब्द ओठांवरचे, आता मधाळलेले!

दिलेस तू मला काय, हे तुलाच ठाऊक नाही.
तूच दिलेस माझे, श्वास गहाळलेले!

दे हातात हात माझ्या, चल घेऊ सात फेरे.
नशिबास मी कधीही… नाही विचारलेले!

Saturday, August 3, 2013

आता!

पावसात पैश्यांच्या, नाचतात मोर आता,
पाठलाग कोतवालांचा, करतात चोर आता.

हृदयी असायचे, जे इमान एके काळी,
वाण्याच्या दुकानी ते, मिळते समोर आता.

तिरडीस कमी, पडतात चार खान्दे.
मुडदे स्वतःच लावती, पूरायास जोर आता!

फासावरून सुटायची, नसे आता रे चिंता
किंमत स्वतःच सांगतो, गळफासाचा दोर आता!

पाप आणि पुण्याची असे एकच तागडी,
चारुदत्ताची जागा सांभाळते, एक शेंबडे पोर आता!!!

Friday, August 2, 2013

स्पर्श!

केलास जो स्पर्श तू, तो थंड-गार होता.
घेऊन आग प्रेमाची, काळ पसार होता.

वाटले तुला मी द्यावे, श्वासांसकट देह माझे
लावाया बोली माझी, भरला बाजार होता.

वाटले मी हाथ धरावा, अन् उचलूनी न्यावे तुला.
हाय माझी मजबुरी! तो नुसताच विचार होता!

तू न कधी माझी, अन् मी न कधी तुझा.
आपल्या कहाणीचा, एवढाच सार होता.

वाट तुझ्या होकाराची, चितेवरही पाहिली मी.
नकार द्यायचा तुला हा, कसला आजार होता?

आसवांनी भिजली जेव्हा, लाकडे माझ्या चितेची,
ठिणगी प्रेमाची पेटली तुझ्या, देवही हुशार होता!

Thursday, August 1, 2013

का जगण्याचा खेळ सारा?

का ही हजार दुःखं, का जगण्याचा खेळ सारा?
काही आता कळेना, गेला कुठे निवारा.

ओढून चांदण्यांची, जरी चादर झोपतो मी,
अंधार वेढलेला. आणि थांबलेला वारा.

दुःखांची लाट आली, आसवांचा पूर आला.
तो दूर दूर गेला, मी जो गाठला किनारा!

टाकाया जीव गेलो. जाळाया जीव गेलो.
दुःखांचा श्वासांवारती,  असे खडा पहारा!

पावती स्मशानाची, ठेवतो खिश्यात सदा मी.
जाळेल जो दयाळू, मी शोधतो तो निखारा!

घाव!

सुकले ना कधी जे, असे माझे घाव होते.
भोंदू वैद्यांचे, उपचार बनाव होते.

अश्याच माणसांनी,केले ते घाव सारे,
मनावर कोरले मी, ज्यांचे नाव होते.

ज्या ज्या मंदिरी मी, टेकण्यास गेलो माथा,
त्या त्या देवतांचे, शत्रूंशी ठराव होते!

कशी जिंकणार होतो, बाजी कोणती मी?
आधीच विकलेले, बाजारी डाव होते!

आला जो गळा कापाया, तो सुरा प्रत्येक नवा होता.
अरे...फौलाद कापण्याचे, त्यास कोठे सराव होते?!!

Saturday, July 13, 2013

ओठ!

काहीच क्षण होते. भिजलेले मन होते.
तुझ्या ओठांवरून टिपायचे, थेंबांचे कण होते!

हळूच स्पर्श झाला, एक लाजरा हर्ष झाला.
मिठीत घ्यायचे की नाही...प्रश्न गहन होते!

तुझ्या ओठांपर्यंतची,एक सरळच वाट होती.
त्याच सरळ वाटेवर पण, एक नाजूक वळण होते!

तुझ्या लाजणाऱ्या डोळ्यांमध्ये,
माझ्याशीच भांडणाऱ्या, माझ्या मनामध्ये,
कळूनही न कळणाऱ्या विचारांचे...
  असे कोणते दळण होते?

तुझ्या ओठांवरून टिपायचे, थेंबांचे कण होते!

ती नसते जेव्हा...

का वाजला अलार्म तो? का जाग आली?
दिसणार नाही आज 'ती', मग का सकाळ झाली?

पाहून जागं मला,सिगरेट फूद्कन हातात आली.
घेताच नाव 'तिचे', विना-माचिस जळाली!

टपरीची ओसाड गर्दी, मी चिडलो पावसावरती.
पापण्यांची छत माझी, तिच्या आठवणीत गळाली!

दिवस ढकलला, सांजही पळवली.
हट्टी रात्र होती, मागे न वळाली!

मी मिटले हळूच डोळे, 'ती' पटकन समोर आली.
मी मिठीत भराया गेलो, 'ती' लाजून दूर पळाली!

दिसणार आज 'ती', जेव्हा खबर ही मिळाली,
सुर्याला म्हणालो पळ आता...चंद्रोदयाची वेळ झाली!

Thursday, February 28, 2013

जगलो असा कसा मी...

जगलो असा कसा मी?
जगलो कसा बसा मी!
हसले खदा-खदा ते,
रडलो ढसा-ढसा मी!

खेचून पाय गेले,
वेचून 'हाय' गेले,
काढून 'माय' गेले,
छळलो जसा जसा मी!

डोळ्यांतले पाणी,
हृदयात आग आणी
खचलो जसा जसा मी,
पेटलो तसा तसा मी!

Thursday, January 31, 2013

तू असणार नाहीस!

पुन्हा बोलणार नाहीस, 
पुन्हा दिसणार नाहीस.
असतील आठवणी तुझ्या,
तू असणार नाहीस!

लिहिणार ना कधी मी,
कागदांवर नाव तुझे.
खोट्याच रागाने पुन्हा,
तू ते पुसणार नाहीस.
असतील आठवणी तुझ्या, तू असणार नाहीस!

घेऊन येणार ना कधी,
मी माझ्या कविता.
तू त्या कवितांवर,
पुन्हा हसणार नाहीस.
असतील आठवणी तुझ्या, तू असणार नाहीस!

वेडच प्रेम माझं,
मी आजही तुझाच वेडा.
पण ह्या वेड्या प्रेमावर माझ्या,
तू पुन्हा रुसणार नाहीस!
असतील आठवणी तुझ्या, तू असणार नाहीस!

Wednesday, January 30, 2013

नथुराम!

खून से लथपत,
जल रही थी धरती.
हर तरफ अंधेरा था,
एक चिंगारी भडकी.
  नथुराम.  नथुराम.  नथुराम!

ऐनक पह्ने भी,
जो देख ना पाया.
अपने ही वतन को,
जिसने फाँसी चढाया,
उसका तो एक ही अंजाम,
   नथुराम.  नथुराम.  नथुराम!

सहने की सीमा
पार हो चुकी थी
अहिंसा से कब की
हार हो चुकी थी.
बंदूक से दागी गोली,
काम किया तमाम.
   नथुराम.  नथुराम.  नथुराम!

युगों युगों तक,
दिलों दिलों मे,
गुँजेगा एक ही नाम...
    नथुराम.  नथुराम.  नथुराम!

Sunday, January 6, 2013

ख्वामखाँ

जो था, वो ख्वामखाँ था,
सरकती जमीन पर,अपना मकान था!


एक झूठी उम्मीद पे, झिंदगी कट रही थी 
बस, कट ही तो रही थी झिंदगी, मै जी कहाँ रहा था?

ढुँढता रह गया, भीड मे उसे,
वो जाना सा चेहरा, ना जाने कहाँ था!

वो धुंदली सी यादे उसे, कुछ फिकी सी याद होंगी
जब याद भी ना किया उसने, मैं तब भी वहाँ था!

जो आये, वो सब ले गये,
चंद ख्वाईशो मे सिमटा, जो अपना जहान था!

चलो इस बात की तो, तसल्ली है आखिर
जो ले गया कब्र तक, वो उसीका बयान था!