PayPal

Monday, December 31, 2012

पुन्हा!

पुन्हा आलीस तू,
पुन्हा मन बावरे,
नकळत तुझ्याकडे,
घेई पुन्हा धाव रे!

लेखणीला माझ्या,
गंज थोडा चढला होता.
आज पुन्हा कविता माझी,
घेई तुझे नाव रे!

पुन्हा दिसलीस तू,
पुन्हा हसलीस तू.
पुन्हा हरलो मनाशी,
मी तोच जुना डाव रे!

तू नदी माझी.
मी एकटा किनारा.
तुला भेटायला पुन्हा,
शोधतो मी नाव रे!

ने हा माझ्या,
कवितांचा नजराणा.
पडणार वाटेत ना तुझ्या,
पुन्हा कधी माझे गाव रे!

Wednesday, December 5, 2012

आँसुओकी टँकी कहाँ है?

मैं और मेरी तन्हाई,
जब साथ होते हैं.
सोचते है दोनो 
जब रोते हैं,
इन आँसुओकी टँकी कहाँ है??

कहीं दिमाग मे तो नहीं?
जैसे आसमान से, बारिश का पानी टपकता है.
या फिर है दिल मे कहीं?
जैसे ज॒मीन चिरने पे, पानी निकलता है?
बता दे कोई,
इन आँसुओंकी टँकी कहाँ है??

सोचते हैं हम दोनो,
हमारी खामोशियो से पूछ ले.
शायद... कोई खामोश जवाब मिल जाए!
या  पूछ ले हमारी सिसकियों से.
शायद ये अटपटा सवाल सुनकर,
उनके चेहरे खिल जाए!
बस सोचते ही रेहते हैं...
इन आँसुओंकी टँकी कहाँ है??

जब मैं और मेरी तन्हाई,
उस शावर के नीचे,
थोडासा सुकून ढुँढते हैं,
मायूस होकर फिर जब,
वो नल बंद करते है,
एक खयाल फिर दिमाग मे आता है...
'अपने आँसुओंका नल तो,
हमेशा खुला रेहता है!!!

समझ मे ही नही आता...
इन आँसुओंकी टँकी कहाँ है??

Thursday, November 22, 2012

शोधतो मी!

सरकलो मी जेव्हा, सारेच कोसळले होते.
कोसळलो स्वतः आता, आधार शोधतो मी!

दयेचा अर्ज माझा, हातात सुरा त्यांच्या.
वाटलं त्यांना अजून एक, वार शोधतो मी!

तपलो उन्हात मी, विरहाच्या.
प्रेमाची सावली आता, गार शोधतो मी!

शोधावया मी गेलो, जेव्हा कोणी आपले,
वाटलं त्यांना खांदे, चार शोधतो मी!

अजूनही मी माझी, तलवार टाकली नाही.
तीच जुनी पुन्हा, धार शोधतो मी!!!

Sunday, November 18, 2012

हिंदुहृदयसम्राट

तू गेलास, आणि महाराष्ट्र पोरकं झालं.
पुन्हा आमच्यासाठी, मशाल हाती घेशील का?
  सांग ना 'बाळ' तू पुन्हा येशील का?

महाराष्ट्राला विकायला काढतील रे हे लोक.
तू पुन्हा तुझ्या भाषणांनी, ह्यांना चपराक लावशील का?
        सांग ना 'बाळ' तू पुन्हा येशील का?


आम्हाला कळतंय. तुझ्या जाण्याचं कारण.
वरती ही बहुदा, हिंदूंचं अस्तित्व धोक्यात असेल.
   तिथला निकाल लावून, तू परतशील का?
       सांग ना 'बाळ' तू पुन्हा येशील का?

नको येउस तू, जमणार नसेल तर.
निदान आम्हाला तरी, तुझ्यासोबत नेशील का?
   
               सांग ना 'बाळ'... :-(

जसा माझा शिवाजी...तसाच माझा बाळ.एकेरी उल्लेखाबद्दल क्षमा असावी!


Wednesday, October 31, 2012

माझ्या आयुष्याची कहाणी!

माझ्या आयुष्याची, एवढीच कहाणी,
त्यांचे महोत्सव, माझी आणी-बाणी

त्यांचे सगळेच गुन्हे माफ होते.
त्यांनी केले ते योग्य, माझी ती मनमानी!

मारून प्रेम माझे, वेशीवर टांगले गेले.
महाली सुखात होती, माझी ती राणी!

आयुष्यभर वाटेत माझ्या, काटेच दिले त्यांनी.
समाधी तरी कुठे माझी, सजवली फुलांनी?

हाडेही माझी, चोखून खाल्ली त्यांनी.
सोडली नाही मागे, कोणतीच निशाणी!

तोंड बंद करून माझं, मी संपणार नाही.
बंडखोर पिढ्या उद्याच्या, गातील माझीच गाणी!
 
   माझ्या आयुष्याची, एवढीच कहाणी!

Tuesday, October 30, 2012

वणवा

उगाच वाटलं मला, मी त्यांना हवा होतो.
गर्दीत खेळीयांच्या, मी थोडा नवा होतो!

प्रेंमानीच त्यांनी, घात माझा केला,
शहाणे ते निघाले, मीच येडझवा होतो!
    गर्दीत खेळीयांच्या, मी थोडा नवा होतो!

लाख कत्तली करूनही, पाणावले नं डोळे त्यांचे.
थोबाडावर हसू त्यांच्या, मीच हळवा होतो!
    गर्दीत खेळीयांच्या, मी थोडा नवा होतो!

वाटलं त्यांना, जाळून संपलो मी.
अरे... पेटवलं जग शब्दांनी, मी तो वणवा होतो!!!
    गर्दीत खेळीयांच्या, मी थोडा नवा होतो!

Monday, October 29, 2012

कुत्र्यांची नवी जमात!

कुत्र्यांची नवी जमात,
दोन पाय, दोन हात!

बिस्कीट पाहून लाळ गाळतात.
प्रेम करण्याऱ्यावर भुंकतात.
       कुत्र्यांची नवी जमात,
                दोन पाय, दोन हात!


चोरांना जवळ करतात,
पोलिसांना पळवतात.
कुत्र्यांची नवी जमात,
                दोन पाय, दोन हात!

नसलेली शेपूट,
नं जाणे कशी हलवतात.

कुत्र्यांची नवी जमात,
                दोन पाय, दोन हात!

Sunday, October 28, 2012

दुनियादारी

पुरे झाली साला ही दुनियादारी.
ते म्हणे संत. मी व्यभिचारी!

स्वागतार्ह मी नव्हतोच कधी,
लाथाडलं त्यांनी, गेलो ज्या दारी!

प्रेमाची दुकाने त्यांनी, थाटात मांडली होती,
दर-फलकही होते, त्या बाजारी!

परवडणारं नव्हतंच, कधी प्रेम मला,
ते होते श्रीमंत, मी कवी भिकारी!

सुखांचे देणे, चुकते मी केले.
दुःखांची बरीच, राहिली उधारी!

अस्थिंस तरी माझ्या, मिळेल का नदी माझी?
की राहतील पडून तशाच, एकट्या किनारी?

शोक करायचेही, ठरलेले दिवस तेराच,
हाय...हे जग कित्ती व्यवहारी!!!
            पुरे झाली साला ही दुनियादारी!!!
                 

उधार

आयुष्यभराची, लायकीच कुठं माझी?
काही क्षण जगण्यापुरतं, प्रेम उधार दे!

फाटकी झोळी माझी, भरू तरी कशी मी?
प्रेमाचे क्षण फक्त, दोन-चार दे!

ती वळलेली पाठ तुझी, पाहून कंटाळलो मी.
तीच नजर तुझी, एकवार दे!

खूप सहन केला, मी दुरावा तुझा,
सह्न्यापलीकडला असा, एकच वार दे!

मी मेल्यावर तरी, जाळू नको मला,
चितेला अग्नी माझ्या, थोडी गार दे!!!

                  सह्न्यापलीकडला असा, एकच वार दे!

Saturday, October 27, 2012

वाट

आयुष्य माझे, मला नको नकोसे,
मृत्यूची आता, पाहतो वाट मी!

तसा बऱ्याच वेळा, मी जिवंत मारलो गेलो,
अजूनही जिवंत कसा? अचाट मी!

मी स्वतः मृत्यूला, आमंत्रण दिलं होतं,
पळालो कधी, तराट मी?

उगाच नाही, त्या रात्री पाहून आलो,
जाळतील मला जिथं, तो घाट मी!

यमालाही बहुदा, भेट नको माझी,
शोधेन कशीबशी, वरची वाट मी!

अंतयात्रा तुम्ही, रात्रीच न्या माझी,
पाहिली नाही कधी, पहाट मी!
             मृत्यूची आता, पाहतो वाट मी!

Thursday, October 18, 2012

माजोर्डी शान माझी!

त्या सत्तांध दरबारी, वाकली नं मान माझी.
होतीच कुठे झुकाऊ, माजोर्डी शान माझी!

आवाज त्यांचा, वाढवला त्यांनी.
सोडली मी तरी, कुठे ताण माझी!
        होतीच कुठे झुकाऊ, माजोर्डी शान माझी!

ताज त्यांच्या, डोक्यावर जरी होता,
पायांत माझ्याही होती, वहाण माझी!
       होतीच कुठे झुकाऊ, माजोर्डी शान माझी!

असो लखलाभ त्यांना, त्यांच्या अमृताचा प्याला.
दिले जहर त्यांनी, भागली तहान माझी!
       नव्हतीच कधी झुकाऊ, माजोर्डी शान माझी!



Saturday, October 6, 2012

शोध!

शोधतो  मी तुला, की तू शोधतेस स्वतःला?
हरवलीस, की जाणून लपलीस तू?

 खरंच तुला माझ्या, बोलण्याचा राग आला?
 पुन्हा एक बहाणा, की खरंच रुसलीस तू?

 तू म्हणालीस, "प्रेम नसतं रे."
ते  होतं मत तुझं, की मला विचारलीस तू?

तुझे  डोळेही हल्ली, काहीच बोलत नाहीत
खरंच ते गप्प, की त्यांना शिकवलीस तू?

नकार  देऊन मला, काय मिळालं तुला?
फसवलीस मला, की स्वतः फसलीस तू?

का ढाळतेस माझ्या आता, चितेवरी आसवे तुझी?
रडलो मी जेव्हा, उगाच हसलीस तू!







Tuesday, October 2, 2012

ग्रहण

माझ्याच आयुष्याशी, वैर माझं,
घालतो  वाद मी, माझ्या नशीबाशी !

लाथाडून मी, नक्षत्रांची देणी,
झोपतो मी घेऊन, ग्रहणं उशाशी!

 प्रेमाचा माझा, रिक्त हा प्याला,
डोळ्यांत तुझ्या मी, पाहतो अधाशी!

तुझे आणि माझे, तेवढेच एक नाते होते,
पटले ना माझे, या बेरकी जगाशी!

म्हंटलं तुला, तुझी आवडती भेट द्यावी,
जगण्याची  आस मी, सोडली मघाशी!
 
            झोपतो मी घेऊन, ग्रहणं उशाशी!



नामंजूर!

एकदाच दे, हातात हात माझ्या,
मग बघू काय आपल्या, हातात नाही!

हातातली ती धूर-कांडी, तू सांगतेस मला फेकायला,
अगं लाजली कधी ती, माझ्या ओठांत नाही!

कधी मी विचारलं? तू केव्हा 'नाही' म्हणालीस?
दिला असशील नकार तू, माझ्या स्मरणात नाही!

अखेरपर्यंत घेतील, नाव तुझेच प्रिये,
दगाबाजी  माझ्या, श्वासात नाही!

पुरे झाले आता, सारे तुझे बहाणे,
नामंजूर मला, तू नशिबात नाही!

Sunday, September 30, 2012

कविता!

तू असलीस की कविता, तू नसलीस की कविता!
तू हसलीस की कविता, तू रुसलीस की कविता!
तू बोललीस की कविता, बोलली नाहीस की कविता!
तू  जवळ आलीस की कविता, दूर गेलीस की कविता!
तू पाहिलीस की कविता, तू टाळलीस की कविता!

तुझं पडलेलं स्वप्न कविता,
कधीकधी तुझा पडलेला चेहरा कविता!
तुझं विनाकारण भांडणं कविता,
पुन्हा मी बोलण्याची वाट बघणं कविता!

तुझं काही नं बोलता, खूप काही बोलून जाणं कविता,
मी खूप काही बोलूनही, तुझं काही नं ऐकणं कविता!

माझ्या शब्दांची वेडी आशा कविता,
तुझ्या डोळ्यांची वेड लावणारी भाषा कविता!

तुझ्यासवे माझी बोलकी कविता,
तुझ्याविना माझी ... पोरकी कविता!!!

Thursday, September 27, 2012

मनात प्रेम तुझ्या...

ओठांवर राग तुझ्या, डोळ्यांत द्वेष खोटा,
मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!

नाना बहाणे,नकाराचे तुझ्या,
होकार त्यातला, मी जाणून आहे...
        मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!

न  वाचलेली ती कविता, तू जाळली का नाहीस?
नसेल माहीत तुला, मी ओळखून आहे...
         मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!

बघून डोळ्यांत माझ्या, दे उत्तरं सारी.
का  झुकते नजर तेव्हा, मी पारखून आहे...
        मनात प्रेम तुझ्या, मी वाचून आहे!

ऐक माझं जरा, हारशील तू प्रिये,
खेळ  हे सारे, मी खेळून आहे!!
  
     मनात प्रेम तुझ्या,
                       मी वाचून आहे!


Wednesday, September 26, 2012

वेड तुझं...

माझ्या कवितांनाही, किती वेड तुझं
करतात कौतुक तुझं, विसरून मला!

डोळेही माझे, फितूर झाले आता
बघतात तुला ते, चुकवून मला!

बेभान मन माझं, तुझ्यामागे पळत सुटलं
पत्ता आता विचारतं, हरवून मला!

हृदयावरही आता, माझा भरवसा नाही
झाले तुझ्या नावावर, ठगून मला!

या सगळ्यांसमोर आता, हार पत्करली मी
तूही घे ना आता, समजून मला!

Monday, September 24, 2012

आज पुन्हा मन माझे...

आज पुन्हा मन माझे, उगाच मोहरून गेले.
आज पाहणे तुझे पुन्हा, हृदय माझे चोरून गेले!

केला मीही प्रयत्न, थोडं दूर राहण्याचा,
पुन्हा मनानी तुझ्याकडे, मला ओढून नेले!

सोड रुसवे-फुगवे, दे ना पुन्हा तेच...
हास्य जे मनावर, नाव तुझे कोरून गेले!

माझ्या प्रेमाची, पुरे आता परिक्षा,
कप्पा कप्पा माझ्या मनाचा, तुझे मन तपासून गेले!

                   आज पुन्हा मन माझे, उगाच मोहरून गेले!

उरले फक्त आता...

संपले आता तुझ्याशी, कवितांचे देणे-घेणे,
उरले फक्त आता, चिंध्यांवर शब्द काही!

संपले आता तुझ्याकडे, माझे येणे जाणे,
उरल्या फक्त आता, त्या पाउलवाटा काही!

संपले आता तुझेही, माझ्याकडे पाहणे,
उरल्या फक्त आता, अबोल नजरा काही!

संपलेत श्वास माझे, हे देह माझे न जाणे,
उरल्या फक्त आता, त्या वेड्या आशा काही!

संपलेत का तुझे ते, मला टाळण्याचे बहाणे?
उरले असतील तर सांग आता, क्षण अजून जगेन काही!
उरले फक्त आता, चिंध्यांवर शब्द काही!

Saturday, September 22, 2012

ओठांना सांग तुझ्या...

सांग ना तुझ्या डोळ्यांना, थोडं गप्प बसायला.
ओठांना सांग तुझ्या, थोडं खरं हसायला!

वळलेली पाठही, आरसा तुझ्या मनाचा.
मनाला  सांग तुझ्या, माझ्या पुढे बरसायला!

आधीच त्या एकल्या रात्री जाळत होत्या.
दिवस पुन्हा का दिलेस, तू मला छळायला?

लाथाड तू कितीही, हृदय दिवाने माझे
प्रेमाचा  हक्क माझा, मी येईन पुन्हा मागायला!

नकारातही तुझ्या, होकार ऐकू येतो.
ह्याचं कारण तूच, विचार जरा स्वतःला!

मी कुठे तुझ्याकडे, मागितले चंद्र-तारे?
एक नजर तुझ्या प्रेमाची, पुरे मला जगायला!!!!!!
   ओठांना सांग तुझ्या, थोडं खरं हसायला!

अंतर

ना बोलणार मी काही, ना बोलणार तू काही.
पण अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!

ना बघणार मी कधी, ना बघणार तू कधी.
पण नजरेचा काय भरोसा, की ती पाहणार नाही!
    अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!

ना  मी लिहिणार काही, ना तू वाचणार काही.
शब्द माझे तुझ्याकडे, मी आणणार नाही!
   अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!

नसणार  मी आता, तुझ्या जागण्याचं कारण.
जागेल मन माझं, मी जागणार नाही!
   अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!

ना  मी मागणार काही, ना तू देणार काही.
तुला देतोय प्रत्येक श्वास माझा, मी सांगणार नाही!
   अंतर तुझ्या-माझ्यातलं, शांत राहणार नाही!

मजकूर!

का अशी तू दूर दूर आता?
मनात माझ्या, आसवांचा पूर आता!

सांग ना, असं काय बोललो मी?
का तुझी नजर, फितूर आता?

छळतो हा दुरावा तुझा
आठवणींत तुझ्या, मी चूर आता!

दे ना पुन्हा, ते हास्य सोनेरी
अबोला छळवादी तुझा, मी आतुर आता!

शब्द नाही, हृदय बोलले माझे
सांग ना, कसं खोडू तो, मजकूर आता?
                                का अशी तू दूर दूर आता?

बदल!

लागतात जिव्हारी तुझ्या, बोल माझ्या गाण्यातले
मग सांग किती जीवघेणे, बदल तुझ्या वागण्यातले!

छळते ना तुला ती, एकटक नजर माझी?
दिसतात का तुला ते, क्षण माझ्या जागण्यातले ?

केलेस दूर मला, मी दूर गेलोच नाही
तू टिपलेस नेमके, भास माझ्या जाण्यातले!

का तुला मी दोष देऊ? अपेक्षा तरी कशाची?
मीच मानले तुला, अर्थ माझ्या जगण्यातले!

एक साधा कवी मी, मन वेडे माझे
घेऊन भिकार शब्दं, तारे मागतो गगनातले!

साहजिकच आहेत ते, बदल तुझ्या वागण्यातले!

Sunday, September 16, 2012

खरं सांगू?....



हसलीस तू जेव्हा, कधी ओठांनी... कधी डोळ्यांनी
 तू हुदय चोरलेस माझे.


चिडलीस तू जेव्हा, कधी माझ्यावर... कधी स्वतःवर
 तू काही श्वास चोरलेस माझे.

गेलीस दूर जेव्हा, काही दिवस...काही क्षण
 तू चित्त चोरलेस माझे.

तू म्हणालीस, मला द्यायला,
 तुझ्याकडे काहीच नाही.
खरं सांगू?....तू शब्द चोरलेस माझे.

Saturday, September 15, 2012

माझ्याच शब्दांनी माझे, काळीज जाळतो मी!

हसून टाळतेस तू, शब्द जे माझे
त्याचं शब्दांनी  माझे, काळीज जाळतो मी!

चुकवून ते पहारे, त्या असंख्य नजरा,
तुझ्या केसांत कवितांचे, फुल माळतो मी.

देशील हात तुझा, घेशील नाव माझे
वेडी  ही आशा, मनात पाळतो मी.

नसशिलच तू बघितले, पाणावलेले डोळे माझे
नेमकं त्याचं क्षणी तुझी, नजर टाळतो मी.

किती गं मी वेडा...कसले हे वेड माझे?
चुकवून मी फुलांना, काट्यांवर भाळतो मी.

खोटं हसू माझं, हुंदके मुके माझे
अश्रू तरी कुठे, ओले गाळतो मी?

माझ्याच शब्दांनी  माझे, काळीज जाळतो मी!


नसेन मी जेव्हा...

नसेन मी जेव्हा, काही ऐकायला
तू हळूच आण, ओठांवर नाव माझे.

नसेन मी जेव्हा, काही ऐकवायला
तू हळूच उलट, कवितांचे पान माझे.

नसेन मी जेव्हा, तुला हसवायला
तूच घे हसून, आठवून शब्द माझे.

नसेन मी जेव्हा, हात तुझा मागायला
कर बंद डोळे, आठव ते स्पर्श माझे.

नसेन मी जेव्हा, असेन मी तेव्हा
असतील शब्द माझे. असेल प्रेम माझे.
    नसेन मी जेव्हा...

प्रेमासाठी...

थोड्याशाच प्रेमासाठी, तुझ्याकडे बघितलं मी.
का घाबरलीस एवढी? असं काय मागितलं मी?

का म्हणून तू,
एवढी चिडलीस गं?
जे होतं मनात माझ्या,
तेच सांगितलं मी.
 का घाबरलीस एवढी? असं काय मागितलं मी?

चल...सोड. हस ना थोडं आता.
तुला  उगाच थोडं... चिडवून बघितलं मी.

तू...

अधीर तू, निवांत तू
शांत तू, अशांत तू.

तू बोलकी, मुकी ही तू
शांत तू, अशांत तू.

एकली  गर्दीत तू
शांत तू, अशांत तू.

तू  आपली, परकी ही तू
शांत तू, अशांत तू.

सखी  ही तू, प्रिया ही तू
शांत तू, अशांत तू.

सत्य  तू, स्वप्न तू
शांत तू, अशांत तू.
    पण जीव माझा प्राण तू!

हे असंच चालायचं?

माझ्याकडून सगळं काढून घ्यायचं
स्वतः मात्र गप्प बसायचं.
   हे असंच चालायचं?

तू अगदी निवांत झोपायचं,
मी मात्र रात्रभर जागायचं.
  हे असंच चालायचं?

बघितलं मी की पाठ फिरवायची.
मी  फिरवली की रुसायचं.
  हे असंच चालायचं?

तिरपा  कटाक्ष टाकून, गालातल्या गालात हसायचं.
पण काहीच झालं नाही, असं दाखवायचं.
  हे असंच चालायचं?

मी  बोलण्याचे, भेटण्याचे मार्ग शोधायचे.
तू मात्र मला 'वेडा' ठरवून मोकळं व्हायचं.
  हे असंच चालायचं?
     अजून किती टाळायचं?
      सांग ना!

ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.

घेऊन जा तुझे हे देणे नक्षत्रांचे,
ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.

पाहून तुझ्याकडे, शब्द बे-लगाम सुटले.
सोड.विसर.ती कविता खरी नाही.
      ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.

मी  लेखक, मी कवी, मी प्रेमी, मी बरंच काही.
तुला सोन्या चांदीनी मढवण्या इतका...
मी हरहुन्नरी नाही.
     ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.

कळते  माझी जागा, तुझ्या माझ्यातलं अंतर.
समजतं सगळं मला, तू बोललीस जरी नाही.
     ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.

शब्द  संपले माझे, डोळेही मुके झाले.
तूच बोल ना, आता तरी काही!
    ग्रहणाशी अशी ही, चेष्टा बरी नाही.

Wednesday, September 12, 2012

जीव माझा प्राण तू,

जीव माझा प्राण तू,
हे जाणूनही अजाण तू.

तू स्वप्न माझे ध्यान तू,
हे जाणूनही अजाण तू.

तू मोहिनी, तू मृगनयनी, तू मखमली,
शब्द माझे गाण तू.
हे जाणूनही अजाण तू.

तू  रीत माझी प्रीत तू
गीता तू कुराण तू.
हे जाणूनही अजाण तू.
की  जीव माझा प्राण तू!

Tuesday, September 11, 2012

पण तरीही

लेखणीतून शब्द उतरले
तिने ही ते. हळुवार हसत वाचले.
पण तरीही...शब्द मनातच राहिले!

मी तिच्याकडे, एकटक बघितलं
मी बघतोय, हे तिला ही कळालं.
पण तरीही...शब्द मनातच राहिले!

तिने विचारण्याचा प्रयत्न केला...
मी  सांगण्याचा.
पण तरीही...शब्द मनातच राहिले!

बऱ्याचदा मी चुकून, खूप काही बोलून गेलो.
ती ही जवळजवळ सगळं काही समजून गेली.
पण तरीही...शब्द मनातच राहिले!
कधी माझ्या, कधी तिच्या !

Monday, September 10, 2012

डोळ्यांची भाषा

समजून घे तू, डोळ्यांची भाषा
शब्दांना ओठांवर, येण्याची सवय नाही.

धरला हात जरी मी,
तो हाताचा हट्ट होता .
एवढे  धाडस नक्कीच,
करणार  हृदय नाही.
  
समजून घे तू, डोळ्यांची भाषा
शब्दांना ओठांवर, येण्याची सवय नाही.

     तू असलीस जवळ की,
      मी  माझा उरत नाही.
      बोलतात जे डोळे तो,
      माझा अभिनय नाही.
समजून घे तू, डोळ्यांची भाषा
शब्दांना ओठांवर, येण्याची सवय नाही.

शब्द




कुठे माझ्या प्रियेला, कळतात शब्द माझे.
म्हणूनच दूर तिच्यापासून, पळतात शब्द माझे.
  
 पचवले कित्येक उन्हाळे,
   तिच्या विरहाचे.
   भर पावसात आता,
   जळतात शब्द माझे.

      ओठांपर्यंत येऊन,
      पुन्हा मागे फिरतात.
      गिरणीत मनाच्या,
       दळतात शब्द माझे.

          कधी वाटतो,
          हा अबोलाच बरा बरासा.
          उगाच मला मग,
          छळतात शब्द माझे.

              कुठे प्रिये तुला, कळतात शब्द माझे?/
               मग का तुझ्याच वाटेकडे, वळतात शब्द माझे?
                                    सांग ना...!