PayPal

Thursday, June 26, 2014

जन्म

भोगली जी जिंदगी, धूरात उडाली
ऊरली जी जिंदगी, पेल्यात बुडाली!

जन्माचा अर्थ मला, गंडवून गेला
कळली ना जिंदगी, दुनिया कळाली

सखे होते जे, सोबती होते कुठे?
चंद्रमुखी ने दिला दगा. पारो ही ना मिळाली!

श्वासांनी सोडली साथ माझी, हे देहही ना उरले माझे
मृत्यूही ऐनवेळी माझी, मागे वळाली

एकटेच सरले आयुष्य माझे, सरणाच्याही तेच नशिबी
पाहून वाट माझी, चिता एकटीच जळाली!

Saturday, February 8, 2014

प्रणय!




आपल्या प्रणयाची खोली, मी का आवरावी?
ती विस्कटलेली चादर मी, तशीच पांघरावी.

राहुदे तशीच जरा, माझ्या कुशीतली उशी तुझी.
आठवण तुझी पुन्हा मी, मिठीत आवळावी.

वेडा चंद्र बघ तो, खिडकीतुनी डोकावतो.
ईर्ष्या माझी त्याने, किती करावी!

मी पुन्हा धुंद होऊन, बेफाम सुटावे.
ती लाजरी नजर तुझी, पुन्हा बावरावी.

सरावी अशी आता, प्रत्येक रात्र प्रिये,
चांदणी प्रत्येक आपुल्या, प्रेमात नहावी!

Friday, February 7, 2014

आरोळी



अंगणात अश्रूंचा सडा, अन् दुःखांची रांगोळी.
मी घालतो शब्दांना रक्ताने, अभ्यंग आंघोळी!

साठवू कुठे मी आता, हे हृदयाचे तुकडे?
फाटका माझा खिसा अन्, फाटकीच झोळी.

जो रंग भरलास तू, तो केव्हाच उतरला.
उरला हा रंग काळा, आणि कोरडीच होळी.

दिसली तुला कधी ना,ऐकूही न आली तुला,
अदृश्य व्यथा माझी अन्, मुकीच आरोळी.

दे थोडे मलाही, ते हिरव्या कागदाचे तुकडे,
लावीन म्हणतो मी ही, माझीच बोली!

दिलासा



तेव्हा माझ्या जीवाला, लाभला दिलासा,
केलास तू मिठीत माझ्या, प्रेमाचा खुलासा.

तू ही तेव्हा, थोडी शहारली होतीस,
केला मी स्पर्श जेव्हा, ओठांनी जरासा.

केसात तुझ्या, ओल्या मातीचा गंध होता,
मी ही मग थोडा, बरसलो नभासा.

चुम्बले मी तुझे, क्षण अन् क्षण एकांती.
प्रत्येक क्षण मला, लागला मधासा.

किती लांब वाट आहे! केवढी ही ‘वाट’ आहे!
घेऊ दे सात फेरे, आता...थांब रे प्रवासा!

Wednesday, February 5, 2014

उखाणा!




करून घे तू आता, वाटेल तितका बहाणा
घेशील तू उद्या, माझाच उखाणा!

कितीही जरी तू, पाठ फिरवलीस आता,
ओठ मागतील तुझे, माझ्या ओठांचा नजराणा

जायचं ठरवलं आहेसच तर, होऊदे तुझ्या मनासारखं.
थोडे तुझेही डोळे, पुसून जरा जा ना

शब्दांच्या फुलांनी गझलांचा, गजरा माळतो मी.
केसाने गळा कापणाऱ्या, यारचा मी दिवाणा

तू दे नकार आता, कर अजून माज थोडा.
मिळवेन वा मरेन मी... हा माझा बाणा!!!

Saturday, November 30, 2013

इच्छा!

फक्त इतकीच इच्छा, हा प्रवास संपावा.
दुःखांशी माझा, सहवास संपावा.

मृत्यू येऊन भेटावी, प्रत्यक्ष मला.
खोटेच जगण्याचा, भास संपावा.

कुठे शब्दांनी माझ्या, मिळवले तुला?
त्यांचा हा निकामी, प्रयास संपावा.

झेंडूची फुले चढावीत, तिरडीवर माझ्या.
गुलाबांचा आता, सुवास संपावा.

ऐकून तुझ्या ओठी, गीत कोणतेही माझे,
देहावरी श्वासांचा...मिजास संपावा!!!

Wednesday, November 27, 2013

मागणे!

मी अजूनही तुझ्याकडे, आणखी काहीच मागत नाही.
अश्रू दे अजून थोडे, एवढ्याने भागत नाही.

चुम्बले मी ओठ तुझे, ते त्या मिठीचे पाप होते.
विश्वास ठेव थोडा, मी खोटं सांगत नाही.

नशेत तुझ्या मी, थोडा अडखळलो होतो.
पिल्यावर सहसा मी, असा वागत नाही.

देवानी तरी झोळीत माझ्या, का टाकावे तुला?
त्याच्यासमोर दिवा, मी लावत नाही.

लिहायसाठी मला आता, मन दे तुझे जरा.
कागदांवर प्रेम माझे, आता मावत नाही!