PayPal

Sunday, October 13, 2013

मजाल!

भरल्या बाजारपेठी,फिरती दलाल आता.
भडव्यांच्याच माथी,लागे गुलाल आता.

उघड्यावर मांडलेले, नागडे इमान त्यांचे.
पांघरती फाटलेली, अब्रूची शाल आता.

विकली माय मराठी,लाविली हाय बोली.
ती 'ठेवलेली' इंग्रजी, नांदते खुशाल आता.

पडली ओसाड कधीची, वेश्यांची वस्ती.
इमान 'झोपते' खाली, झाली कमाल आता.

भोगती बंडखोर सारे, काळ्या पाण्याची शिक्षा.
ते चोर पांढरपेशी, बांधती महाल आता.

शब्दांची फौज घेऊन, गझलेने चढवेन हल्ला.
पुढे उभे ठाकण्याची, कोणाची मजाल आता!


Thursday, October 10, 2013

माज!

मी ही पाहतो करून, आता माज जरा.
वाजवून पाहतो मी ही, बंडाचा साज जरा.

ऐकविले दुनियेने, ऐकून घेतले मी.
मी ही चढवेन म्हणतो, माझा आवाज जरा.

बेईमानी ह्या जगाशी, ईमानी वागणे झाले.
मी ही होतो आता, दगाबाज जरा.

झाला आता रिकामा, संयमाचा प्याला.
मस्तीची दारू थोडी, आता पाज जरा.

आणा जवळ तुमचा, माजोर्डा गाल आता.
माझ्याही तळहाताला...सुटली खाज जरा !

Wednesday, October 9, 2013

वहाण!

मी सैरभैर वारा, माझे ठिकाण नाही.
फक्त हृदयात राहतो मी, दुसरे कोणतेच स्थान नाही.

जंगलात शतपावली, करणारा सिंह मी.
लाळ घोटणारा, मी श्वान नाही.

असतील तुडुंब भरलेल्या, तुमच्या बाजारपेठा.
कधीच थाटिले मी, माझे दुकान नाही.

मी का भीख मागू? शब्दांचा बादशहा मी!
गझल माझी नाही बिकाऊ. मी ही गहाण नाही!

कशास जुमानू,  आज्ञा तुमची मी?
डोक्यावर ठेवितो मी...माझे वहाण नाही!

Saturday, October 5, 2013

ओठ मी तुझे ...



चौकटींतच होते, आयुष्य आखलेले.
बंदिस्त आयुष्य माझे, दु:खांनी माखलेले.

आसवे सदाच होती, अगदी चिकटून मला.
सुख सारे होते, दूर पांगलेले.

काय काय म्हणुनी तुला, आज सांगू मी?
कोण-कोण कसे-कसे, तेव्हा वागलेले.

स्मशानी देह फक्त, जायचे राहिले होते.
मन केव्हाच माझे, होते राख-लेले.

तू आलीस आणि, मन माझे मोहरून गेले.
आयुष्य माझे, तुझ्यामुळेच बहरलेले.

तू विचारलीस मला, हा गोडवा कुठून आला.
ओठ मी तुझे तेव्हा... होते चाखलेले!

नाव

का म्हणुनी आता, मी थांबावे?
का दूर तू असावीस, का दूर मी रहावे?

सोडूनी जाताना, सुटतो हा श्वास माझा.
किती वळून मी बघावे, अन् थांबून तू पहावे?

किती तोल जावा, माझ्या आसवांचा?
मनाने स्वतःला, किती सावरावे?

छळते रात्र मला ती, खिन्न तारकांची.
एकांत मी अजुनी, किती पांघरावे?

दे कौल तूच आता, ही आहे व्यथा तुझीही.
शब्दांनीही किती, मोकळेच परतावे?

नावापुढे तुझ्या तू, लाव नाव माझे.
बनाव ह्या जगाला, प्रेम आपुले कळावे!

Thursday, October 3, 2013

मंजूर...

मी नाही मनुष्य नाही,
मी एवढा क्रूर नाही!
 ही जात खाटीकांची मला मंजूर नाही!

      तुम्हीच रचा नवे हे,
      संगीत जगण्याचे,
     लागेल नाटकी जो,
     तो माझा सूर नाही!
       ही जात खाटीकांची मला मंजूर नाही!

            ही कसली आसवे तुमची?
             हे कसले सरण माझे?
           मी जाळले देह कधीचे,
          हा ताजा धूर नाही!
                 ही जात खाटीकांची मला मंजूर नाही ! 

शुद्ध काळा!

ह्या थोरल्या बांडगुळात, मी ही बाळ नाही.
सशत्र बंडखोर मी, मी मवाळ नाही!

हातावर लेखणीने माझ्या, मीच आखतो रेषा.
नशिबी गहाण ठेवले, मी माझे कपाळ नाही!

माझ्याच गीतांवर, वाजतात ढोल-ताशे.
मळलेल्या हातांतला, मी टाळ नाही!

येणाऱ्या पिढ्यांच्या, हृदयातले गीत मी.
विसरतील मला काय, मी भूतकाळ नाही!

ह्या पांढरपेशी भुरट्यांचे, मी कशास झिजवू उंबरे?
शब्द शुद्ध काळे माझे, मी ही गव्हाळ नाही!