PayPal

Saturday, August 3, 2013

आता!

पावसात पैश्यांच्या, नाचतात मोर आता,
पाठलाग कोतवालांचा, करतात चोर आता.

हृदयी असायचे, जे इमान एके काळी,
वाण्याच्या दुकानी ते, मिळते समोर आता.

तिरडीस कमी, पडतात चार खान्दे.
मुडदे स्वतःच लावती, पूरायास जोर आता!

फासावरून सुटायची, नसे आता रे चिंता
किंमत स्वतःच सांगतो, गळफासाचा दोर आता!

पाप आणि पुण्याची असे एकच तागडी,
चारुदत्ताची जागा सांभाळते, एक शेंबडे पोर आता!!!

Friday, August 2, 2013

स्पर्श!

केलास जो स्पर्श तू, तो थंड-गार होता.
घेऊन आग प्रेमाची, काळ पसार होता.

वाटले तुला मी द्यावे, श्वासांसकट देह माझे
लावाया बोली माझी, भरला बाजार होता.

वाटले मी हाथ धरावा, अन् उचलूनी न्यावे तुला.
हाय माझी मजबुरी! तो नुसताच विचार होता!

तू न कधी माझी, अन् मी न कधी तुझा.
आपल्या कहाणीचा, एवढाच सार होता.

वाट तुझ्या होकाराची, चितेवरही पाहिली मी.
नकार द्यायचा तुला हा, कसला आजार होता?

आसवांनी भिजली जेव्हा, लाकडे माझ्या चितेची,
ठिणगी प्रेमाची पेटली तुझ्या, देवही हुशार होता!

Thursday, August 1, 2013

का जगण्याचा खेळ सारा?

का ही हजार दुःखं, का जगण्याचा खेळ सारा?
काही आता कळेना, गेला कुठे निवारा.

ओढून चांदण्यांची, जरी चादर झोपतो मी,
अंधार वेढलेला. आणि थांबलेला वारा.

दुःखांची लाट आली, आसवांचा पूर आला.
तो दूर दूर गेला, मी जो गाठला किनारा!

टाकाया जीव गेलो. जाळाया जीव गेलो.
दुःखांचा श्वासांवारती,  असे खडा पहारा!

पावती स्मशानाची, ठेवतो खिश्यात सदा मी.
जाळेल जो दयाळू, मी शोधतो तो निखारा!

घाव!

सुकले ना कधी जे, असे माझे घाव होते.
भोंदू वैद्यांचे, उपचार बनाव होते.

अश्याच माणसांनी,केले ते घाव सारे,
मनावर कोरले मी, ज्यांचे नाव होते.

ज्या ज्या मंदिरी मी, टेकण्यास गेलो माथा,
त्या त्या देवतांचे, शत्रूंशी ठराव होते!

कशी जिंकणार होतो, बाजी कोणती मी?
आधीच विकलेले, बाजारी डाव होते!

आला जो गळा कापाया, तो सुरा प्रत्येक नवा होता.
अरे...फौलाद कापण्याचे, त्यास कोठे सराव होते?!!